पैठण, (प्रतिनिधी) पैठण तालुक्यात विविध भागांत सर्रासपणे वाळू व मुरूमाचा मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या उपसा सुरू मात्र, या प्रकाराकडे महसूल व पोलीस प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
बिडकीन, पैठणखेडा, कृष्णापुर, चितेगाव, आखातवाडा बालानगर, हिामांडवा परिसरात दिवस-रात्र वाळू व मुरूमाची अवैधरित्या वाहतूक सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. हायवा, डंपर, ट्रॅक्टर तसेच इतर वाहनांमधून मोठ्या प्रमाणात गौण खनिजांची वाहतूक होत असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. मात्र महसूल व पोलीस प्रशासनाकडून कारवाईचे ठोस चित्र दिसत नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पैठण तालुक्यात कुठेही वाळूचा लिलाव झालेला नाही तसेच मुरूम उपसा करण्याला तहसील कार्यालय मार्फत परवानगी दिलेली नाही असे असताना कृष्णपूर, चितेगाव , बिडकीन, पैठणी एमआयडीसी बालानगर परिसर रहाटगाव, आखातवाडा परिसरात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या उपसा सुरू आहे.
तसेच पैठण शहरातून सर्रासपणे वाळूची वाहतूक सुरू आहे. प्रतिष्ठान महाविद्यालय परिसर, आयटीआय, पाटेगाव, चनकवाडी, दादेगाव, वडवाडी, नायगाव, मायगाव, आपेगाव, उंचेगाव, टाकळी अंबड, हिरडपुरी या परिसरात गोदावरी नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उपसा सुरू आहे याकडे महसूल व पैठण, पाचोड, एमआयडीसी, बिडकीन पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. दादेगाव परिसरात काही दिवसांपूर्वी अवैधरित्या वाळू उपसा करताना काही वाहने जप्त केली होती.
परंतु पोलिसांनी आर्थिक देवाण-घेवाण करून ती वाहणे सोडून दिली असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाची भूमिका ही आता चर्चेचा विषय बनली आहे. रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणावर होणारी वाहतूक दिसत असताना संबंधित यंत्रणेला याची माहिती नाही का, असा सवाल नागरिक विचारत आहेत. अवैध उपसा होत असल्यास त्यावर तातडीने कारवाई करणे अपेक्षित आहे.
परंतु याकडे महसूल व पोलीस प्रशासन अर्थपूर्ण दुर्लक्ष करताना दिसत आहे. रस्त्यांची दुरवस्था आणि शासनाच्या महसुलाची संभाव्य हानीया सर्व गंभीर बाबींकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
आता जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पैठण तालुक्यातील वाळू व मुरूम उत्खननाची सखोल चौकशी करावी, संबंधित ठिकाणी संयुक्त पथके पाठवावीत आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पैठण तालुक्यात नेमके काय सुरू आहे? अवैध वाळू मुरूम उपसा होत असल्याच्या तक्रारींवर कारवाई कधी होणार? जनतेच्या तक्रारींची दखल घेऊन महसूल व पोलीस प्रशासनाने अवैध वाळू व मुरूम उपसा करणाऱ्या माफियावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.















